सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहने




पालकमंत्री व गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गमध्ये नागरिकांसह पर्यटकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा नियोजन निधीतून सुमारे ३ कोटी ७४ लाख रुपयांच्या खर्चातून ही वाहने खरेदी करण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण, तपासाची गती आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे अधिक प्रभावी होणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आधुनिक साधनसामग्री देणे गरजेचे आहे. “पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी आणि ‘नशामुक्त जिल्हा’ ही ओळख निर्माण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.



गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सागरी सुरक्षेवर भर देत किनारपट्टी भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची घोषणा केली. “यामुळे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल,” असे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपाध्यक्ष दादा साईल, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना

यावेळी ‘सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशन’ या नव्या संस्थेच्या स्थापनेचा ठराव प्रमाणपत्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्विकारला. ही संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असून, जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तसेच सामाजिक, शैक्षणिक व कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत राहणार आहे.





Post a Comment

Previous Post Next Post