श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा सोहळा शिस्तबद्ध पार पाडावा


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश ; प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष आढावा बैठक घेण्यात आली. जोतिबा डोंगरावरील यात्री निवास हॉल येथे दुपारी ४ वाजता ही बैठक पार पडली.


या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतून लाखो भाविक येत असल्याने नियोजन अधिक प्रभावी व वेळेत करण्यावर भर देण्यात आला. मागील वर्षीच्या यात्रेचा आढावा घेऊन यंदाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष डोंगर परिसराची पाहणी केली. यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले. स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले असून, भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी व शौचालयांची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यावर भर देण्यात आला.



दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी सावली व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामस्थांनी श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले.


भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य विभाग व सीपीआर रुग्णालय, तर वाहतुकीसाठी एसटी महामंडळ व केएमटी परिवहन विभाग यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. तसेच वीज पुरवठा, आरटीओ, आपत्ती व्यवस्थापन व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


“यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत आणि सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.



Post a Comment

Previous Post Next Post