कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष

 


महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळत असून, यामुळे त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हास्तरीय ‘सिंधुसरस व मिनी सरस २०२६’ प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूल पटांगण येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

२१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या प्रदर्शनात तब्बल ७५ स्टॉल्स सहभागी झाले असून, बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


उद्घाटनानंतर पालकमंत्र्यांनी स्टॉल्सना भेट देत महिलांच्या उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘सिंधुसरस’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत.

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार वाढणे आवश्यक असून, बचत गटांनी योग्य नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत तसेच पालकमंत्री म्हणून आवश्यक ते आर्थिक पाठबळ देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी या प्रदर्शनात केवळ उपस्थिती नोंदवून न जाता महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, माजी आमदार अजित गोगटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद कामत यांनी ‘सिंधुसरस’ हे केवळ प्रदर्शन नसून महिलांच्या सक्षमीकरणाचा उत्सव असल्याचे सांगितले. महिलांनी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले असून नागरिकांनी खरेदीद्वारे त्यांना पाठबळ द्यावे, असे त्यांनी नमूद केले.


जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अशा प्रदर्शनांमुळे महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ मिळून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने आर्थिक प्रगतीला गती मिळते, असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०१६ पासून आतापर्यंत बचत गटांसाठी सुमारे ८५० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १० हजार बचत गटांमधून १ लाख महिला जोडल्या गेल्या असून, या उपक्रमांमुळे अंदाजे १५ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे.

कार्यक्रमात समीर चराटकर यांच्या सुरेल गायनाने रंगत वाढली. सूत्रसंचालन गुरव यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयप्रकाश परब यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post