कल्याण, ( शंकर जाधव) : १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या मतदानासाठी लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरीता तयार करण्याची प्रक्रिया (EVM Commissioning) सोमवारी सावित्रीबाई फुले कलामंदिर, तळ मजला, डोंबिवली (पूर्व) येथे आज सुरू झाली. सार्वत्रिक विधानसभा निवडणुकाकरीता निवडणूक यंत्रणा पूर्णपणे कार्यरत झाली असून, १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात ४३३ + १ (Auxiliary) अशी एकूण ४३४ मतदान केंद्रे आहेत.
आज प्रथम निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर चिठ्ठ्या टाकून एकूण मतदान केंद्रांच्या ५ % म्हणजेच एकूण २२ EVM ची निवड करण्यात आली. सदर EVM मध्ये प्रत्येकी १००० मतांसाठी अभिरुप मतदानाची (मॉक पोल) प्रक्रिया सुरु करण्यात आली.
१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ४३४ मतदान केंद्रांमध्ये संपन्न होणा-या मतदान प्रक्रियेसाठी ५२० CU व ५२० BU आणि ५६४ VVPAT यंत्रे मतदानासाठी तयार करण्याची प्रक्रिया आज सकाळपासून निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे. सदर प्रक्रिया आज आणि उद्या संपूर्ण दिवस सुरू राहील.

