भराडी आईने मला भरभरून आशीर्वाद दिले - रविंद्र चव्हाण

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीचा महाविजय झाला, त्यामुळे भाजपसह महायुतीमधील पक्षात उत्साहाचे वातावरण असून नेते आपापल्या आराध्य देवतांचे दर्शन घेत आहेत. भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी श्री क्षेत्र आंगणेवाडी येथे विराजमान असलेल्या श्री देवी भराडी आईच्या चरणी नतमस्तक होत आईचे आशीर्वाद घेतले. 


"सर्व कोकणवासीयांप्रमाणे माझीही श्री क्षेत्र आंगणेवाडी येथील भराडी आईच्या चरणी श्रद्धा आहे. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असो; प्रत्येक कामाची सुरुवात ही भराडी आईच्या दर्शनानेच करत असतो. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप-महायुतीचा प्रचारप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर प्रचारप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून महायुतीचा प्रचार करण्याची सुरुवात देखील आई भराडी देवीचे दर्शन घेऊन केली होती. त्यावेळी महायुतीचा महाविजय व्हावा आणि महाराष्ट्राच्या हिताचे महायुती सरकार सत्तेत पुन्हा स्थापन व्हावे, असे साकडे आईच्या चरणी घातले होते. 


आईने भरभरून आशीर्वाद दिलेत, या आशीर्वादामुळे राज्यात भाजप-महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. त्यामुळे या विजयानंतर पुन्हा एकदा आईचे मनोभावे दर्शन घेतले." असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजप-महायुतीचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने कोकणवासी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post