ठाणे शहर वाहतूक पोलिसांचा विशेष मदत उपक्रम
ठाणे : दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मदत उपक्रम राबवला आहे. रस्त्यातील अडचणींमुळे परीक्षा चुकू नयेत, यासाठी तब्बल ५४ ‘रायडर्स’ तैनात करण्यात आले असून हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, अचानक वाहतूककोंडी किंवा इतर आपत्कालीन अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
वाहतूक विभागाकडून शहरातील विविध महत्त्वाच्या मार्गांवर ५४ रायडर्स तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ट्राफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांक आणि हेल्पलाईन क्रमांकांसह १८ वाहतूक युनिटमार्फतही संपर्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातही तीन वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता १० वी) परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत इयत्ता १२ वी साठी १२६ परीक्षा केंद्रे तर इयत्ता १० वीसाठी २२३ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यात अडचण आल्यास तातडीने मदत मिळण्यासाठी ही विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
विद्यार्थी किंवा पालकांनी अडचण निर्माण झाल्यास वाहतूक विभागाच्या ट्राफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300, 8286400400 तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 7039003866 वर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी त्वरित पोहोचून वाहतूक पोलिसांकडून मार्ग मोकळा करून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यात मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीपुरतीच उपलब्ध असणार आहे. परीक्षा काळात पालकांनी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून या उपक्रमाला सहकार्य करावे, असेही आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

