नवीन नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर; लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांवर भर
मीरा रोड: वसई-विरार महानगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांसाठी मीरा रोड येथील ७/११ क्लब येथे आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका, जबाबदाऱ्या आणि पारदर्शक कारभाराचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जनतेशी थेट संवाद राखणे, नागरिकांच्या अपेक्षा समजून घेणे आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने काम करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. यांच्यातील दुवा म्हणून संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, असाही आ. केळकर यांनी मोलाचा सल्ला दिला.
दीर्घकालीन राजकीय व प्रशासकीय अनुभवाच्या आधारे काही प्रत्यक्ष उदाहरणे देत, कार्यकाळात येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात तसेच विकासकामांना गती देण्यासाठी कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास गटनेते अशोक शेलके, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील तसेच महानगरपालिकेचे इतर मान्यवर नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. जनतेच्या सेवेसाठी अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

