मुख्य निवडणूक आयुक्तांची अलिबाग तालुक्यातील मतदान केंद्राची पाहणी

 मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमला भेट

अलिबाग \ धनंजय कवठेकर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ पार पडण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.


जिल्ह्यात शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, निवडणुकीसाठीची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, वरसोली, सेंट मेरी हाय स्कूल यासह नेहुळी येथील मतमोजणी केंद्र, साहित्य वितरण केंद्र आणि स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र शेळके, अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मतदान प्रक्रियेसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, प्रथमोपचार किट तसेच पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी बैठक व्यवस्था यासह आवश्यक सुविधा पुरवल्या आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचेही सांगितले गेले.


मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदारांना आवाहन केले की, संपूर्ण प्रक्रिया निःपक्ष, निकोप व भयमुक्त वातावरणात पार पडेल; त्यामुळे मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा.




Post a Comment

Previous Post Next Post