कल्याण, ( शंकर जाधव) : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस म्हणजे दि. २० नोव्हेंबर आता दृष्टीक्षेपात येवून ठेपला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या विधानसभा निवडणूकीत मतदान करावे, म्हणून निवडणूकीच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम सुरु आहे. १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातही मतदान जनजागृतीसाठी स्वीप ॲक्टीव्हीटींचे आयोजन करण्यात आले आहे.
या मतदार मसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (BLO) मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण करण्याचे आणि त्याचबरोबर मतदानाची जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दि. १५ नोव्हेंबरपर्यंत या मतदार माहिती चिठ्ठ्या मतदारांपर्यत पोहचवून, त्याचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिले आहेत.
मतदान जनजागृतीसाठी १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ निवडणूक परिक्षेत्रात ठिकठिकाणी मतदार शपथ, मतदान जनजागृतीविषयक मनोवेधक रांगोळ्यांचे सादरीकरण त्याचप्रमाणे प्रमुख चौकात, सार्वजनिक वर्दळीचे ठिकाणी मतदानाविषयी भित्ती चित्रे/भित्ती फलकही प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच सेल्फी स्टॅन्ड उभारण्यात आले आहेत.