सी – व्हिजील ॲपव्दारे ३२ तक्रारींची नोंद

 


 तक्रारदारांना आपले नाव गोपनीय ठेवून दाखल करता येते तक्रार

कोल्हापूर, (शेखर धोंगडे) :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आचारसंहितेचा भंग करणा-या घटनांवर  अंकुश ठेवण्यासाठी सी- व्हिजिल ॲप विकसित करण्यात आले असून जिल्हयामध्ये दि. ११ नोव्हेंबर अखेर एकूण ३२ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींवर सी- व्हिजिल जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत निपटारा करण्यात आला आहे. तक्रारदारांना आपले नाव गोपनीय ठेवून तक्रार दाखल करता येते. त्यामुळे सी व्हिजिल ॲपवर नागरिकांनी आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार दाखल करावी असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे. 


सी-व्हिजील ॲपव्दारे प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघामध्ये ९२ भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याची तक्रार भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ द्वारे थेट निवडणूक आयोगाकडे दाखल करणे सोपे झाले आहे. या ॲपद्वारे नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जाते. तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.






सी- व्हिजील ॲपव्दारे मतदारसंघनिहाय प्राप्त तक्रारींची संख्या पुढीलप्रमाणे : कागल मतदारसंघ – ३, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ – १३, करवीर मतदारसंघ – १, कोल्हापूर उत्तर मतदारसंघ – ११, शाहूवाडी मतदारसंघ – २, हातकणंगले मतदारसंघ – २ अशा एकूण ३२ प्राप्त तक्रारींचा निपटारा जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आलेला आहे.

सी-व्हिजिल ॲप अँड्रॉइड मोबाईलवर किंवा आयओएस डिव्हाईसवर डाऊनलोड करता येते. आचारसंहिता भंगाच्या किंवा राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहताही या ॲपचा वापर करुन काही मिनिटांतच तक्रार नोंदवता येते. तक्रार नोंदवण्यासाठी या ॲपमध्ये आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडून यात घटनेचा तपशील, ठिकाण, वेळ नोंदवावी लागते. यासोबत आचारसंहिता उल्लंघनाच्या घटनेची छायाचित्रे किंवा व्हिडिओ डाऊनलोड करावा लागतो. सीव्हिजिल ॲप हा जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी संबंधित यंत्रणेशी नागरिकांना जोडतो, त्यामुळे तक्रारीवर आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने होते तसेच नोंदवलेल्या तक्रारीची माहितीही गोपनीय ठेवली जाते. या सर्व बाबींमुळे निवडणूक आयोगाला आचारसंहिता उल्लंघनाच्या घटनांवर अंकुश ठेवणे शक्य झाले आहे. 

जिल्हयातील सुजाण नागरिक म्हणून सी- व्हिजील ॲप इनस्टॉल करावे. तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास या ॲपव्दारे तक्रार नोंद करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post