Champions trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ खेळण्यावर अद्याप निर्णय नाही


 नवी दिल्ली : पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दरम्यान,भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवण्यास सहमती दर्शवलेली नाही. मात्र ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्यास पीसीबी सहमती दर्शवू शकते असे देखील म्हटले जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या तयारीची पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी आयसीसीचे एक शिष्टमंडळ १०-१२ नोव्हेंबर दरम्यान लाहोरला भेट देणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. या काळात  चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक ११ नोव्हेंबरला आयसीसीकडून जाहीर केले जाऊ शकते. पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "पीसीबीने काही महिन्यांपूर्वी पाठवलेले संभाव्य वेळापत्रक आयसीसीशी चर्चा केली आहे आणि तेच वेळापत्रक ११ नोव्हेंबरला जाहीर करावे अशी त्यांची इच्छा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र  जर भारतीय संघ आपले सामने संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि शारजाह येथे खेळू शकण्यास तयार असेल तर पीसीबी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्यास सहमती दर्शवू शकते. त्याचबरोबर जर भारत सरकारने पाकिस्तान दौऱ्याला मान्यता दिली नाही, तर वेळापत्रकात काही बदल केले जाऊ शकतात. कारण भारतीय संघाचे सामने संयुक्त अरब अमिराती आणि शारजाह येथे खेळण्यावर भर असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत पीसीबीने आयसीसीकडे मागणी केली आहे की, बीसीसीआयने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय लेखी स्वरूपात द्यावा. २०२३ मध्ये आशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते, तेव्हा ते देखील हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केले गेले होते. या काळात भारताने श्रीलंकेत आपले सामने खेळले होते.  

Post a Comment

Previous Post Next Post