नवी दिल्ली : दिल्लीस्थित जनकल्याण मोर्चा या स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
यावर्षीच्या कार्यक्रमाला खासदार चिराग पासवान यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विविध मान्यवरांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रिलायन्स मेडलबचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप दिघे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी वैद्यकीय सेवाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः कोविड महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजातील सर्व स्तरांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे कार्य केले.
कोविड संकटात त्यांनी स्वतःच्या पत्नीला गमावले, तरीही न खचता त्यांनी सेवा कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या या निस्वार्थ आणि समर्पित कार्याची दखल घेत जनकल्याण मोर्चातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करत त्यांच्या कार्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संस्थापक डॉ. अशोक चौधरी यांनी सुमारे ३६ वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात केली. समाजातील उपेक्षित घटक तसेच विविध क्षेत्रात राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
एक शाम देश के नाम” या कार्यक्रमाचा उद्देश समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा आहे. संस्था गेल्या ३६ वर्षांपासून आरोग्यसेवा, शिक्षण, महिला कल्याण, कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत कार्यरत आहेत.
डॉ. अशोक चौधरी,राष्ट्रीय अध्यक्ष जन कल्याण मोर्चा

