नवी दिल्ली : भारतात थंडीच्या मोसमाला सुरुवात होत असतानाच २५, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी दक्षिण तामिळनाडू, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे. याशिवाय निकोबार बेटांवर २४ नोव्हेंबरपर्यंत आणि रायलसीमा येथे २६ आणि २७ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. आयएमडीच्या ताज्या माहितीनुसार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे.
आठवड्याभरात, ईशान्य भारतात सामान्यपेक्षा जास्त आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. IMD ने २४ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पंजाब, हरियाणा आणि चंदिगडच्या वेगळ्या भागात दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हिमाचल प्रदेशात २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी उत्तर भारतातील अनेक भागात हलके ते मध्यम धुके दिसू शकतात.
IMD च्या मते, पुढील आठवडाभरात वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात किमान तापमानात लक्षणीय बदल होऊ शकतात. याशिवाय या आठवड्यात देशाच्या कोणत्याही भागात थंडीची लाट येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील वायू प्रदूषण पातळीत १७ पटीने अधिक वाढ झाली आहे. ज्यामुळे दिल्ली-NCR मधील गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील शाळा फेज ३ आणि ४ हे दोन्ही बंद करण्यात आले आहे. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीचा एकूण AQI 'अत्यंत खराब' ३६९ श्रेणीत नोंदविला गेला आहे.