कल्याण, ( शंकर जाधव) : सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर देयके मालमत्ताधारकांना वितरीत करण्यात आलेली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाही कराची रक्कम दि.३१ डिसेंबर, २०२४ पूर्वी भरल्यास ४% सवलत व ऑनलाईन २% सवलत देण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही मालमता कराची रकमेचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत की, नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा. कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर महानगरपालिकेमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये, थकीत रकमेवर दर महिन्याला २ टक्के रकमेची दंडात्मक कारवाई करणे, नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे यासारखी कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतर थकीत कराची वसुली न झाल्यास मालमत्तांचा जाहिर लिलाव करून त्याव्दारे थकीत कराची वसुली करण्याची तरतूद आहे. परंतु, अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तर नागरिकांनी मुदतीपूर्व मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात येत आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी नागरिक हे नोकरदार व व्यावसायिक असल्याने कार्यालयीन वेळेत त्यांना मालमत्ता कराचा भरणा अधिक सोयीचे व्हावे यासाठी दि.१ डिसेंबर २०२४ पासून सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सर्व नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहेत.
मालमत्ता कराच्या बिलावरील QR-Code स्कॅन करून तसेच महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरुन मालमत्ता कराचा ऑनलाईन पध्दतीने भरणा करून शकता. या सेवेचा लाभ घ्यावा व मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभागाकडून करण्यात येत आहे.