प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह रवींद्र चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ
नवी दिल्ली : वायनाड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी गुरुवारी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांची आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधीही उपस्थित होते. प्रियंकासोबत तिचा मुलगा आणि मुलगी रेहान वड्रा आणि मिराया वड्रा देखील संसदेत उपस्थित होते.
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५,८६,७८८ मतांनी विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेते रवींद्र वसंतराव चव्हाण यांनीही लोकसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. प्रियंकाने वायनाड मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) सत्यान मोकेरी यांचा ४,१०,९३१ मतांनी पराभव केला. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या वायनाडमध्ये प्रियांका गांधी, भाजपचे नवीन हरिदास आणि सीपीआयचे सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढत झाली.