Maharashtra assembly elections 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजघराण्यातील अनेक जण रिंगणात





कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेेक नेत्यांचे सुपुत्र तर राजघराण्यातील अनेक जण रिंगणात आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि इतर राजघराण्यातील अनेक लोक राजकारणातून नागरिकांसमोर येणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी माजी राजघराण्यांवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. विविध पक्षांकडून तिकीट मिळाल्याने सुमारे ४० जागा अशा आहेत की, जिथे माजी राजघराण्यातील सदस्य रिंगणात आहेत. राजघराण्यातील तीन सदस्य हॉट सीटवर एकमेकांना आव्हान देत आहेत. 




कागलमधून समरजितसिंह घाटगे 

कोल्हापूरच्या राजघराण्यातील समरजितसिंह घाटगे यांना कागलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे लढत आहेत. घाटगे राजर्षी हे छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्यातील वंशज आहेत. हसन मुश्रीफ यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडून आले होते.  हसन मुश्रीफ यांनी २०१९ मध्ये समरजितसिंह घाटगे आणि विक्रम सिंह यांचा सुमारे २७ हजार मतांनी पराभव केला होता. घाटगे हे एकेकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात होते.


फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील 

अजित पवार यांनी सचिन पाटील यांना फलटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातून दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. येथे दीपक चव्हाण यांना निंबाळकर घराण्याचे समर्थन आहे. मागील निवडणुकीतही दीपक येथून विजयी झाले होते. २००८ मध्ये परिसीमन झाल्यानंतर, ही जागा अनुसूचित जाती (SC) साठी राखीव ठेवण्यात आली होती.




सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले पाचव्यांदा भाजपच्या तिकीटावर सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले १९७८ ते १९९५ या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता पक्षाच्या तिकिटावर सलग ६ वेळा या जागेवरून आमदार राहिले आहेत. शिवेंद्रराजे यांचा सामना शिवसेनेचे (उद्धव गटाचे) अमित कदम यांच्याशी आहे. शिवेंद्रराजे यांचे चुलते उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.



अहेरी जागेसाठी तीन सदस्य

अहेरी जागेसाठी राजघराण्यातील तीन सदस्य रिंगणात आहेत. अहेरीची जागा राजेशाही आत्राम घराण्याच्या ताब्यात आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या अजितकडून कॅबिनेट मंत्री धरमरावबाबा आत्राम रिंगणात आहेत. त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना राष्ट्रवादीच्या शरदचंंद्र पवार गटाने तिकीट दिले आहे. त्यामुळे येथे बाप आणि मुलीमध्ये स्पर्धा आहे. माजी मंत्री आणि राजघराण्याशी संबंधित असलेले अंबरीशराव आत्राम हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.




कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे यांची माघार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराज यांच्या सून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती. येथून एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने राजेश क्षीरसागर यांना तिकीट दिले आहे. मधुरिमाराजे यांनी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मधुरिमाराजे यांचे पती मालोजीराजे २००४ ते २००९ दरम्यान कोल्हापूर उत्तरचे आमदार होते. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post