रमेश प्रभाकर धनावडे यांच्या 'कवितेच्या सुरातून' या पुस्तकास कोमसापतर्फे पुरस्कार जाहीर!

 



अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : कोकण मराठी साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागातील प्रथम पुरस्कार रमेश प्रभाकर धनावडे यांच्या 'कवितेच्या सुरातून' या पुस्तकास जाहीर झाला आहे. पुढील आठवड्यात एका शानदार कार्यक्रमामध्ये मालगुंड, रत्नागिरी येथे हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

आजवर रायगड भूषण पुरस्कारापासून अनेक पुरस्कार रमेश धनावडे यांना मिळाले आहेत. "कोकण मराठी साहित्य परिषदेचा हा मिळालेला पुरस्कार निश्चितच माझ्यासाठी दिलासादायक, आनंददायक व भविष्यासाठी दिशादर्शक आहे" असे रमेश धनावडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कवितेच्या सुरातून या पुस्तकामध्ये साडेआठशे वर्षापूर्वीचे संतकवी ते आजवरल्या कवींची अशी एकूण ६३ प्रथितयश साहित्यिक कवींची यशोगाथा त्यांनी अधोरेखित केली आहे. या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून सर्वांनाच उपयोग होत आहे त्यामुळे या पुस्तकाला अल्पावधीतच खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या पुस्तकात त्यांनी सर्वच प्रतिथयश साहित्यिक-कवींना न्याय दिला आहे. संत ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, गालिब, मीराबाई, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, वा.रा.कांत, जगदीश खेबुडकर ना.धो. महानोर, अमर शेख, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, सुरेश भट, नामदेव ढसाळ, दया पवार, मंगेश पाडगावकर, एके शेख, गुरु ठाकूर, संदीप खरे यासारख्या अनेक जुन्या नव्या प्रथितयश  कवींच्या निवडक कविता, त्याचे विश्लेषण, कवी विषयी संपूर्ण माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे. एकच पुस्तकामध्ये एवढ्या सगळ्या कवींना एकत्र घेऊन त्याने हा एक ३१६ पानांचा ऐतिहासिक दस्तावेज तयार केला आहे. त्यामुळेच अल्पावधीतच हे पुस्तक रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.


रमेश प्रभाकर धनावडे यांचे शिक्षण एम.कॉम., एल एल. बी., एम.बी.ए. असे झाले असून ते रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर. (कॉर्पोरेट अफेअर्स) म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत.


त्यांचा जीवनगाणे स्तंभ दैनिक कृषीवलमध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता तर 'गुदगुल्या' या राजकीय व सामाजिक वात्रटिका दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच दैनिक रायगड टाईम्ससाठी 'बी  पॉझिटिव्ह' या डिजिटल मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध होत असतात.


त्यांनी माजी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणूनही कार्य केले आहे. तसेच आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचनही केले आहे. ते अलिबाग लायन्स क्लब माजी प्रेसिडेंट असून सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका प्रतिनिधी आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहेत.

'गीत रामायण' व इतर अनेक कार्यक्रमांसाठी त्यांनी सूत्रसंचालन केले असून गोष्ट तिच्या प्रेमाची या मराठी चित्रपटासाठी गीतकार म्हणून ही त्यांनी पदार्पण (गायिका आर्या आंबेकर) केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो व ते अनेक शाळा कॉलेजवर प्रमुख वक्ता म्हणून व अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून आमंत्रित असतात.


त्यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र.वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार,दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार,म. ना. पाटील साहित्य पुरस्कार,  नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार संघ पुरस्कार, स्तंभ विचार परिषद पुरस्कार, सुभानराव राणे प्रतिष्ठान पुरस्कार, साहित्यसंपदा काव्यरत्न पुरस्कार, तेजस्विनी फाउंडेशन कोव्हीड योद्धा पुरस्कार, नवभारत टाईम्स/नवराष्ट्र टाईम्स पुरस्कार, मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेकडून जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post