डोंबिवली ( शंकर जाधव ) : बांगलादेशमधील हिंदू धर्मियांवरील अत्याचार थांबविण्याच्या मागणीसाठी आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या संयोजनाने सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पूर्वेत रिलॅक्स गार्डन नांदिवली ते चक्कीनाका असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात भारतीय जनता पार्टी,विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इस्कॉन, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जागरण मंच अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. बांगलादेशमधील मुस्लिम कट्टरतावाद्यांकडून हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक समुदायांवर गंभीर अत्याचार केले जात आहेत. मंदिरे, घरे, आणि दुकाने पेटवून दिली जात आहेत, हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी.
हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी. आदी मागण्या या जन आक्रोश मोर्चात फलकाद्वारे करण्यात आल्या. या जन आक्रोश मोर्चाला सर्व हिंदू धर्मियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले. या मोर्च्यात आमदार सुलभा गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगर संघचालक डॉ. उमेश कापुसकर, इस्कॉन महंत सारंगधरी दास, हिंदू सेवा संघ पूर्व संघचालक डॉ. विवेक मोडक, निशा सिंग तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य हिंदू बंधू भगिनी उपस्थित होते.