मेस्टा संघटनेची मागणी
दिवा, (आरती परब) : दिव्यातील अनधिकृत शाळेमध्ये मुलीच्या छेड छाडीचा निंदनीय प्रकाराबाबत चौकशी करून त्या शाळेवर कारवाई व्हावी तसेच दिवा भागातील अनधिकृत शाळा बंद कराव्यात, अशी मागणी मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
दिवा येथील एका अनधिकृत शाळेत निंदनीय असा प्रकार घडलेला आहे. अशा अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी मेस्टा संघटनेतर्फे तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे - प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक विभाग, शिक्षण उपायुक्त, चर्नी रोड, मुबंई, तसेच विभागीय आयुक्त शिक्षण विभाग पुणे या विविध ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून दिवा येथे सुरु असलेल्या अनधिकृत शाळांची माहिती शासन दरबारी पोहचवीत आहेत. पण या अनधिकृत शाळा बंद होण्या ऐवजी त्यांची संख्या ४० वरून ७० च्या वर गेली आहे.
या अनधिकृत शाळांना कोणत्याही प्रकारचे गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, लेटर हेड व स्टॅप हे बनवायचे कोणतेही अधिकार नसतांना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरु असून अनधिकृत शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रे दिले जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शिक्षणाधिकारी ठाणे महानगरपालिका, ठाणे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे यांच्या कार्यालयात सातत्याने भेट देऊनही त्यांच्या द्वारे कोणतीही कार्यवाही अनधिकृत शाळांवर करण्यात आली नाही, असेही यावेळी सांगून प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अनधिकृत शाळांवर होत नाही, याचा अर्थ काय समजावा? असा सवाल पत्रकार परिषदेत मेस्टा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४० अनधिकृत शाळांवर एफ.आय.आर. दाखल झाला होता. त्यानंतर वर्ष २४-२५ मध्ये नवीन २३ अनधिकृत शाळा चालू झाल्या आहेत. त्यामुळे दिवा शहरात एकूण ६३ अनधिकृत शाळा सुरू आहेत, परंतु शासनाने फक्त २९ एफआरआय दाखल केले आहेत. संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद व्हाव्यात. या करिता मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे, कोर्टात केस सुरु असून लवकरात लवकर निकालाची अपेक्षा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
ठाणे - कळवा - मुंब्रा येथे ठाणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या प्रमाणे सुरु करण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवर दिवा शहरातही ठाणे महापालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु कराव्यात, जेणेकरून अनधिकृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.पत्रकार परिषदेला मेस्टा संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नरेश पवार, खजिनदार उत्तम सावंत, दिवा अध्यक्ष साईनाथ म्हात्रे, सचिव स्वप्निल गायकर आदी उपस्थित होते.