दिवा, (आरती परब) : स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूलमधील मुलीची वर्गात येऊन छेड काढल्यानंतर आरोपीस पकडण्यासाठी शाळेने कोणतेही सहकार्य न केल्याचे पालकांनी सांगितले. तसेच स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल ही अनधिकृत शाळा असल्याने शिक्षण विभागाने रीतसर बंद करण्यासाठी काल दिव्यातील साऊथ इंडियन या अधिकृत शाळेत पालकांची मीटिंग बोलावली होती. त्यात आम्ही आमची मुले ही शाळा सोडून दुसऱ्या अन्य शाळेत घालण्यास पालकांनी शिक्षण विभागास विरोध दाखवला.
स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूलमध्ये ३ डिसेंबरला वर्गात येऊन एका विकृत इसमाने दहा वर्षांच्या मुलीची छेड काढली होती. त्यानंतर शाळेने बदनामीला घाबरून झालेला प्रकार लपविण्यासाठी सीसीटिव्ही फुटेज पालकांना दिले नसल्याचा मुलीच्या पालकांचे म्हणणे आहे. तर हा एव्हढा मोठा प्रसंग शाळेने शिक्षणाधिकारी कमलकांत म्हेत्रे यांच्या पासून ही लपवला. तसेच ही शाळा अनधिकृत असून त्यांची विद्यार्धी संख्या ही कमी असल्याने ही शाळा पूर्णतः बंद करण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय घेतला.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची काल दिव्यातील साऊथ इंडियन शाळेत मीटिंग घेण्यात आली. तेव्हा काही पालकांना शाळा अनधिकृत असल्याचे पहिल्यांदा कळाले तर काहींनी मुलांना दुसऱ्या शाळेत घालण्यास सहमती दर्शवली. तसेच काही पालक आम्हाला स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूलमध्येच मुलांना शिकवायचे आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना घालायच्या विरोधात आहोत. ही शाळा आमच्या घरापासून जवळ असून फी देखील कमी आहे. तर ही शाळा अनधिकृत असल्यामुळे बंद करण्यात येत असल्यास बाकीच्या अनधिकृत शाळा ही शिक्षण विभागाने बंद कराव्यात अशी आम्हा पालकांची मागणी आहे.
पालकांनी सहकार्य करण्याचे शिक्षण अधिकार्यांचे आवाहन
स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश हायस्कूल दिवा या शाळेत नुकतेच पोक्सो कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्याबाबत संबंधित पालकांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फौजदारी कारवाई केलेली आहे. सदर शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन यांना आम्ही याबाबत वारंवार सूचना देऊनही सदर घडलेल्या गैरप्रकाराबाबत शिक्षण विभागालाही अंधारात ठेवले होते. अद्याप ही त्यांच्याकडून याबाबत कोणताही अहवाल अथवा खुलासा प्राप्त नाही. शिक्षण विभागास सदर शाळेकडून कोणतीही माहिती मिळत नाही.
शिक्षण विभागाने ही शाळा अनधिकृत असल्यामुळे तात्काळ बंद करण्याबाबत गेल्या २ वर्षापासून नोटीसेस दिलेल्या आहेत. तसेच या नोटीसींना शाळेने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे शासन निर्देशानुसार या शाळेवर यापूर्वीच फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या शाळेत घडलेल्या अत्यंत घृणास्पद घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व या शाळेने याबाबत केलेली कमालीची बेफिकिरी पाहता सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे, पालकांच्या सहमतीने, नजीकच्या मान्यता प्राप्त शाळेमध्ये समायोजन केले जात आहे. त्यासाठी या पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे सुरक्षा व भवितव्य लक्षात घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहण्यासाठी शिक्षण विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी सदर पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन कमलाकांत म्हेत्रे, शिक्षण अधिकारी, ठाणे महानगरपालिका यांनी केले आहे.