उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : २००४ साली सुरू झालेला आगरी महोत्सवाचा गजाबाजा जगभरात झाला. कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आगरी समाजाचा झेंडा जगभरात रोवला. अशा हिऱ्यांचा या महोत्सवात जाहीर सत्कार केला जातो. येत्या १० डिसेंबर पासून डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुल येथे सुरु होणाऱ्या '२० वा अखिल भारतीय आगरी महोत्सव' चे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी डोंबिवलीत शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, पदाधिकारी शरद पाटील, भानुदास भोईर, संतोष संते, गुरुनाथ म्हात्रे, जयेंद्र पाटील, प्रवीण पाटील, कांता पाटील, अशोक पाटील, अनंत पाटील, दत्ता वझे, प्रभाकर चौधरी आदी उपस्थित होते.
आगरी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील, माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आगरी महोत्सवाची अधिक माहिती देताना गुलाब वझे म्हणाले, महोत्सवात ' लाडकी बहीण ' करता एक दिवस राखून ठेवला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापण महिलांकडे देण्यात येणार आहे. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात पौराहित्य करणाऱ्यां गुरुजींच्या वेदमंत्रांना महत्व असते तेवढेच महत्व लग्न सोहळ्यामधील धवल्याला असत. समाजातील महिला या धवला गीतांचे मौखिकरित्या संवर्धन करत असते. अशा लग्न सोहळ्यामधील धवल्या गाणाऱ्या लाडक्या बहिणींच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला ' धवल्या -आगरी पौराहित्य' आयोजित केला आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुलमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांच्या टाळ - मृदूंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा मुलाखतपर कार्यक्रमात समाजातील प्रसिद्ध गायकांचा सहभाग असणाऱ्या ' आगरी कोळीगावातील भाव सौंदय'य मुलाखतपर कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, बिग बॉस फेम दादूस संतोष चौधरी, गायक योगेश आग्रावकर, रॉक सिंगर सपना पाटील, बदामचा बादशहा सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे.मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा प्रांतातील साहित्यिकांचा सहभाग असलेल्या परिसंवादात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, महाराष्ट्रसाहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे उपस्थित राहणार असून त्यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे हे संवाद साधतील.यावर्षीच्या महोत्सवमध्ये लाखो पुस्तकांचा खजिना आहे.