कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण गायन समाज, कल्याण (प.) यांच्या संयुक्त उपक्रम
कल्याण ( शंकर जाधव) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण गायन समाज, कल्याण (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने "देवगंधर्व महोत्सवाचे"आयोजन दि.१३, १४ व १५ डिसेंबर रोजी प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
विख्यात शास्त्रीय संगीत गायक आणि वादकांच्या सादरीकरणामुळे देशातील एक महत्वाचा संगीत महोत्सव अशी ओळख असणाऱ्या येथील "कल्याण गायन समाज प्रस्तुत देवगंधर्व महोत्सवात" यंदाही लौकिकाला साजेशा संगीत मैफली होणार आहे. या महोत्सवात कौशिकी चक्रवर्ती, निलाद्रीकुमार, निषाद बाक्रे, मानसकुमार, मंजिरी असनारे-केळकर आदी कलावंत त्यांची कला सादर करणार आहेत. देवगंधर्व महोत्सवाचे हे २३ वे वर्ष असून, संपूर्ण महोत्सवाचे सूत्र संचालन श्रीराम केळकर करणार आहेत. सदर महोत्सवाची रुपरेषा खालीलप्रमाणे राहिल.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ डिसेंबरला रात्री ०८.४५ वाजता होणार असून, पहिल्या सत्रात मंजिरी असनारे केळकर यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना विश्वनाथ शिरोडकर (तबला) आणि सीमा शिरोडकर (हार्मोनियम) साथ करतील. दुसऱ्या सत्रात मानसकुमार यांचे व्हायोलिन वादन होईल. त्यांना ओजस अघिया तबला साथ करणार आहेत.
शनिवार, दि. १४ डिसेंबर रोजी रात्री ०८.४५ वाजता सुप्रसिध्द गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना ओजस अघिया (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम) आणि मुराद अली (सारंगी) साथ करतील.
त्याचप्रमाणे रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दिनकर संगीत विद्यालय आणि म्हैसकर कला अध्यासनाच्या विद्यमाने 'आवर्तन' ही वाद्यसंगीताची मैफल सादर होईल. संकल्पना स्वप्नील भाटे यांची आहे. या मैफलीत स्वप्नील भाटे (तबला), सुधांशू घारपुरे (हार्मोनियम), कौस्तुभ दिवेकर (ड्रम), प्रथमेश तारळकर (पखवाज), क्षमा कुलकर्णी (कथक), ईशान भट (पढत) आणि कौस्तुभ आपटे (गायन) सहभागी होणार आहेत. तसेच संध्याकाळी ०५.३० वाजता निषाद बाक्रे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना विश्वनाथ शिरोडकर (तबला), अनंत जोशी (हार्मोनियम) साथ करतील.
त्यानंतर 'एक शाम निलाद्री के नाम' या मैफलीत सुप्रसिध्द सितारवादक निलाद्रीकुमार यांचे सादरीकरण होईल. त्यांना सत्यजीत तळवलकर (तबला), अँग्नोलो फर्नांडिस (गिटार) आणि शिखरनाद कुरेशी (जेम्बे) साथ करतील. या महोत्सावात प्रवेश नोंदविणार्या नागरिकांनी कल्याण गायन समाज, टिळक चौक, कल्याण (प) अथवा 9820578298 व 9820232659 या नंबरवर संपर्क करावा.