कोल्हापूर ( शेखर धोंगडे) : दख्खनचा राजा जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या दानेवाडी-गिरोली परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने या विभागातील जनतेत घबराट पसरली आहे. दानेवाडी येथील एका मक्याच्या शेतात शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या महिलांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. याच रस्त्यावर मागच्या आठवड्यात रात्री तरुणांना बिबट्या दिसला होता.
बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनविभाग ही सतर्क झाले आहे. वन विभागाचे वनरक्षक योगेश पाटील व रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली असून त्यांनाही बिबट्या दिसून आल्याचे दानेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा, दानेवाडी, गिरोली व केखले हद्दीत वावर असून, या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्क राहावे, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
शेळ्या, मेंढी व जनावरांचे गोठे तातडीने बंदिस्त करावेत. म्हणजे पशुहानी होणार नाही. शिवाय, रात्री लहान मुलांना घराबाहेर सोडू नये यासह आवश्यक ती माहिती वनरक्षक योगेश पाटील यांनी दानेवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिली आहे.