भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट जाहीर
नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड थंडी पडण्यास सुरुवात झाली असताना काही ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली-एनसीआर पाठोपाठ महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सोमवारी सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. यानंतर IMD ने अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रात सोमवारी ढगाळ वातावरण पहावयास मिळाले, त्याचबरोबर काही ठिकाणी दिवसभरातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्ली-NCR तसेच इतर राज्यांमध्ये अलर्ट जाहीर केला आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व राज्यांमध्ये आधीच सुरू असलेली थंडी आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि थंडीची लाट पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने सांगितले की, या पावसामुळे हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, हरियाणा यांसारख्या भागात तापमानात मोठी घसरण होईल आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट पसरेल. तर आंध्र प्रदेश किनारी, उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि रायलसीमा येथे नुकताच मुसळधार पाऊस पडला. तसेच ओडिशा, किनारपट्टी पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालयच्या काही भागांमध्येही पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच २४ आणि २७ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील २४ तासांत उना, हमीरपूर, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचलच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाल्याने थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
