दिवा, (आरती परब) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याला तब्बल ५० वर्षे कायद्याच्या कचाट्यातून मुक्तता मिळाली आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी कल्याण न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्यावरील मुस्लिम संघटनांकडून धार्मिक वापरासाठी दाखल करण्यात आलेला दावा फेटाळून हा किल्ला छत्रपतींच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या तमाम हिंदू बांधवांचा असल्याचा ऐतिहासिक निर्णय कल्याण न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आमदार राजेश मोरे यांनी फटाके फोडून कार्यकर्त्यांना पेढे वाटून जल्लोष केला.
आजचा हा निर्णय छत्रपतींच्या गौरवशाली परंपरेला साजेसा असून, दुर्गाडी किल्ल्याचा स्वाभिमान व हिंदवी स्वराज्याची प्रेरणा कायम राखण्यासाठी हा निर्धार आपण सर्वजण करणार आहोत. दुर्गाडी किल्ल्याच्या मुक्तीसाठी मिळालेला हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासाचा विजय आहे. या ऐतिहासिक भूमीचे जतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन भरीव योगदान करूया, असे डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख तथा आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवून शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणानी परिसर दणाणून गेला. सर्वांना पेढे भरवून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.