पहिल्याच दिवशी आ. प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर

 



खोपट एसटी परिवहन आगाराची पाहणी करत उत्तम सुविधा निर्माण करून देण्याचे दिले निर्देश 


ठाणे , ( रिना सावर्डेकर ) : महायुतीच्या मंत्रीमंडळात राज्य परिवहन मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आ. प्रताप सरनाईक ॲक्शन मोडवर दिसले. त्यांनी रविवारी ठाण्यातील महत्त्वाच्या  खोपट बस आगाराला भेट दिली. यावेळी सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेत प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले, जेणेकरून नागरिकांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल. 



खोपट एसटी आगारात फेब्रुवारी महिन्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात एसटी आगारातील असुविधांविषयी अधिकाऱ्यांना बजावले होते. त्यानंतरही सुविधा उपलब्ध न झाल्याने एसटीच्या कारभाराविषयी सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर  परिवहन व्यवस्थेत सुधारणा करताना स्वच्छता आणि नागरिकांच्या गरजा यांना प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. 



 ठाण्यासह राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला सक्षम, सुलभ आणि सर्वांसाठी सुविधाजनक बनवण्यासाठी परिवहन विभाग कटिबद्ध आहे. या सुधारणा तात्काळ राबवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल असे सांगत परिवहन ही जनतेच्या वाहतुकीचे महत्त्वाचे साधन आहे, त्यामुळे येथे स्वच्छता तसेच उत्तम सुविधा असणे गरजेचे असल्याचे मत आ. सरनाईक यांनी मांडले. 






Post a Comment

Previous Post Next Post