दक्षिणेतील दिग्गज अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर काही आंदोलकांनी अचानक हल्ला केला. आंदोलकांनी प्रथम अभिनेत्याच्या घराबाहेर घोषणाबाजी केली आणि प्रचंड गोंधळ घातला, यानंतर त्यांनी दगडफेक सुरू केली. आंदोलकांनी अभिनेत्याच्या घराबाहेरील फुलांच्या कुंड्याही फोडल्या. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'संध्या थिएटर'मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याबद्दल उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (जेएसी) सदस्यांनी आंदोलन केले. यामध्ये अल्लू अर्जुनने त्या महिलेच्या कुटुंबाला मदत म्हणून १ कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे.
याप्रकरणी आंदोलकांच्या गदारोळानंतर अभिनेता (अल्लू अर्जुन) च्या जुबली हिल्स निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करत ८ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अभिनेत्याला तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला, तर कनिष्ठ न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
कारागृह प्रशासनाकडून जामीन आदेश मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली. अल्लू अर्जुनची दुसऱ्या दिवशी सकाळी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली.
तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला. संवादादरम्यान, या दुःखद घटनेबद्दल माझ्या शोकांतक कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. हे कुटुंब चित्रपट पाहण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत हा प्रकार घडला हे अतिशय दुःखद आहे. जे काही घडले त्याबद्दल मी माफी मागतो, परंतु ते माझ्या नियंत्रणाबाहेर होते. मी अनेक वर्षांपासून थिएटरमध्ये जात आहे, परंतु असे काही कधीच घडले नाही. पुन्हा एकदा शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना. मी शक्यतो कुटुंबाला पाठिंबा देईन असे म्हटले होते.


