डोंबिवली ( शंकर जाधव) : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या हत्येप्रकरणी विविध मागण्या घेऊन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने डोंबिवलीत आक्रोश मोर्चा/रास्ता रोको/निदर्शने करीत डोंबिवली बंदचे आवाहन करण्यात आले. डोंबिवलीकरांचां संमिश्र प्रतिसाद देत बंद मध्ये सहभाग झाले होते. डोंबिवलीत रिपब्लिकन सेनेने भव्य मोर्चा काढत पूर्व आणि पश्चिम चे मार्केट बंद केले होते.या आक्रोश मोर्चाची सुरुवात डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली होती.
आक्रोश मोर्चा स्टेशन परिसरातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे जात असताना रिक्षाचालक मालकांनी तसेच दुकानदारांनी स्वतःहुन आपले व्यवसाय बंद करीत बंद मध्ये सहभाग नोंदवला. पश्चिमेकडील दिनदयाळ चौकात सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला.पूर्व पश्चिमच्या रेल्वे ब्रिजवरून पूर्वेकडील केळकर रोडवरून पोहोचल्यानंतर कामगार नाका चौकात रास्ता रोको करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.त्यानंतर इंदिरा चौकातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करीत सुमारे तासभर भारतीय संविधानाचा आणि महापुरुषांच्या जयघोषांचा गजर करीत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळणेकरिता सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर रिपब्लिकन सेनेने सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास नेमाडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे कल्याण - डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा निमंत्रक (पँथर) आनंद नवसागरे यांनी केले. मोर्चा यशस्वी होनेकरिता रिपब्लिकन सेना महिला अध्यक्ष सुरेखा जाधव, राहुलभाऊ नवसागरे (डोंबिवली विधानसभा अध्यक्ष), जया कदम (डोंबिवली महिला उपाध्यक्ष), सुभाष शिरसाट (कल्याण - डोंबिवली युवा नेते), संदीप हेरोडे (आय टी सेल प्रमुख), युवराज वाटूरे (डोंबिवली शहर संघटक), रमेश ढगे (शहर सचिव), युवा कार्यकर्ते देवानंद खिल्लारे,सुरेश सावंत,किरण वाटाणे,आदींनी विशेष परिश्रम घेतले.
आंदोलनास रिपब्लिकन युवा सेना, रिपब्लिकन रिक्षा चालक मालक वाहतूक सेना, रिपब्लिकन युवा सेना, महिला आघाडी तर्फे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर) गटाच्या वतीनेही ज्येष्ठ नेते मिलिंद वानखेडे, मंगेश जाधव, सुमित कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा चौक डोंबिवली पूर्व येथे भव्य निदर्शने आयोजित केली होती. मोर्चा समारोपावेळी आर पी आय आठवले गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष माणिक उघडे,गवई गटाचे अमित बनसोडे ठाणे जिल्हा प्रभारी,जिल्हा सचिव अनिल खैरनार यांनी हजेरी लावत मोर्चास समर्थन दिले.