रत्नागिरी, ( दिलीप कालेकर ) : जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रेनट्री फाऊंडेशन यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि एकात्मिक विकासासाठी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण विकास, ग्रामीण उपजीविका आणि समाज कल्याण या क्षेत्रांमध्ये एकत्र काम करण्यासाठी आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या उपक्रमात सर्वसमावेशक विकास आणि मानसिक आरोग्यावर विशेष भर दिला जाणार आहे. महिला आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना प्राथमिक भागधारक म्हणून प्राधान्य दिले जाईल, तसेच स्थानिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.
याबाबत मत व्यक्त करताना कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “रत्नागिरीमध्ये, आम्ही आमच्या समुदायांची प्रगती आणि विकास सुनिश्चित करून संपूर्ण जिल्ह्यात विविध विकासात्मक आणि शाश्वत उपक्रम यशस्वीपणे राबवत आहोत. रेनट्री फाऊंडेशननसोबतची ही भागीदारी आमच्या चालू असलेल्या प्रयत्नांना अधिक कौशल्य आणि अचूक दृष्टीकोन देईल, ज्यामुळे आम्हाला आमचा प्रभाव आणखी वाढवण्यास मदत होईल. सोबतच या सामंजस्य करारामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करताना समाजातील विकासाला चालना दिल्याने आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक वेगाने कार्य करू शकतो. या एकत्रित प्रयत्नांमधून आम्ही शाश्वत परिसंस्थेला चालना देऊन आणि समुदायांना सक्षम बनवून, रत्नागिरीला केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात एक आदर्श जिल्हा बनवण्याच्या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत, यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत.”
यावेळी रेनट्री फाऊंडेशनच्या संस्थापक लीना दांडेकर म्हणाल्या, “रेनट्री फाऊंडेशनमध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच शाश्वत, सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून सक्षम समाज आणि शाश्वत परिसंस्था निर्माण करणे हे आहे. पुण्यातील वेल्हे येथे रेन ट्री फाऊंडेशनने दिलेल्या योगदानामुळे स्थानिक समुदायांना सहभागी करून घेतल्याने होणारे सकारात्मक बदल दिसून आले आहेत. जिल्हा परिषद रत्नागिरीसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास आहे की, एकत्रितपणे आम्ही वेल्हेमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीत करू शकतो, ही भागीदारी आमच्या शास्त्री नदी खोऱ्यावर केंद्रित असलेल्या दीर्घकालीन प्रकल्पाचा एक भाग आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “आम्हाला विश्वास आहे की ही भागीदारी जिल्ह्यातील शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जैवविविधतेचे संरक्षण करणे, जलस्रोतांचे सक्षमीकरण करणे, आणि ग्रामीण जीवनमान सुधारणे तसेच सर्वसमावेशकता आणि समुदाय कल्याणाला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही रत्नागिरीला एक समृद्ध आणि विकासात्मक परिसंस्था बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत, जिथे समुदाय आणि निसर्ग एकोप्याने एकत्र राहू शकतील आणि एक प्रेरणादायक उदाहरण निर्माण करतील.”