माजी आमदार सुभाष भोईर यांचा पुढाकार
दिवा, (आरती परब) : शिळ- दिवा रस्त्यावरील चंद्रांगण रेसिडेन्सी गृहसंकुलामध्ये मा. आमदार सुभाष भोईर यांच्या पुढाकारातून व आई वडिलांच्या पुण्याईतून आणि प. पु. स्वामी डी. के. दास महाराज यांच्या आशीर्वादाने बांधण्यात आलेल्या श्री दत्त मंदिरामध्ये दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ४ वा. व सायं. ७.०० ते रात्री १०.०० वा. पर्यंत दिवा विभागातील विविध भजनी मंडळांकडून सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायं. ४.०० ते ६.०० वा. ह. भ. प. श्री. अनंत महाराज पाटील, हेदुटणे यांचे श्री हरिकीर्तन (श्री दत्त जन्माचा) आयोजित करण्यात आला आहे. श्री दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवाचा सोहळा अतिशय भव्यदिव्य प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होत असतो. या सोहळ्याला २३ गावे एकादशी ग्रुप (दिवा, शिळ, देसाई, दहिसर विभाग) तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील वारकरी संप्रदायाची साथ लाभते.
श्री दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने मोठ्याप्रमाणावर भाविक भक्तगण मंदिरा मध्ये दर्शनाकरिता येत असतात. या निमित्ताने श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले आहे.