सिंगापूर: भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. १८ वर्षीय गुकेशने १४व्या गेममध्ये गतविजेत्या डिंग लिरेनचा पराभव करून जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर आपले नाव कोरले आहे. या विजयाबरोबर तो तरुण विश्वविजेता ठरला आहे.
तब्बल १२ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावण्यात एका भारतीयाला यश आले आहे. याआधी, अनुभवी विश्वनाथन आनंदने २०१२ मध्ये बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. हे विजेतेपद पटकावणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरला आहे. चेन्नईचा गुकेश गुकेश हा आनंदच्या अकादमी, वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतो. आनंद हा गुकेशचा आदर्श आहे.
बुधवारी, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या १३व्या गेममध्ये गुकेशला ६८ चालीनंतर बरोबरी साधावी लागली. त्यानंतर ६.५-६.५ अशी बरोबरी झाली. गुकेशने ३रा, ११वा आणि १४वा गेम जिंकला. तर लिरेनने पहिला आणि बारावा गेम जिंकला. उर्वरित सर्व सामने अनिर्णित राहिले. गुुुकेशने १४व्या गेममध्ये लिरेनचा ७.५-६.५ असा पराभव करत बुध्दिबळाच्या पटलावर आपली सत्ता स्थापित केली.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धा जिंकून कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये स्थान मिळवल्यानंतर गुकेशचा वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्याचा प्रवास सुरू झाला. कँडिडेट्स स्पर्धेत फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा ही अमेरिकन जोडी प्रबळ दावेदार मानली जात होती, मात्र गुकेशने सर्वांचा पराभव करून कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकून बुद्धिबळ विश्वात वादळ निर्माण केले आणि त्यात आर. प्रज्ञानंदाचाही समावेश होता. त्यावेळी गुकेशचे वय अवघे १७ वर्षे होते. उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता.