Nanded : माळेगाव यात्रेसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज

Maharashtra WebNews
0

 



यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे - आमदार प्रताप पाटील चिखलीकर  

आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सर्व विभागांचा घेतला आढावा 


नांदेड, : नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच शेजारील राज्य व जिल्ह्यातील अनेक भाविक दर्शनासाठी माळेगाव येथे दरवर्षी येतात. माळेगाव येथील श्री खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांला सर्व सोयी-सुविधा प्राप्त होतील यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे , असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. माळेगाव येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकराच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. 


श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने माळेगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली. २९ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी महावितरण, पाणीपुरवठा, राज्य परिवहन महामंडळ, शिक्षण विभाग, बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग, बांधकाम विभाग आदी विभागांनी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला.




यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा आहे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पशुधनाच्या व कृषि विभागाच्या विविध स्टॉलसह विविध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. यात्रेत सीसीटीव्ही, फिरते शौचालय, सुरक्षा व्यवस्था, शालेय मुलांसाठी माळेगाव येथे सहलीचे आयोजन करण्यात यावे, वाहन व्यवस्था तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन व्यवस्था करण्यात यावी याबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.  यात्रेसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 


यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी, बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी करण्याबाबत अन्न व औषध पुरवठा विभागाला सूचना दिल्या. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यात्रेतील सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. 


या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माळेगावचे सरपंच हनमंत धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त डॉ. घुले व वरिष्ठ अधिकारी व माध्यम प्रतिनिधी तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. 









Post a Comment

0Comments

Post a Comment (0)