भूकंप धक्क्याच्या परिणाम अभ्यासण्यासाठी विशेष यंत्रणा
कराड : कोयनेच्या परिसरात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोयना धरणावर काय परिणाम होतो ? याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी 'स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ' बसविण्यात येणार आहे. सदर कोयना धरण परिसरात होणाऱ्या भूकंपमापनाचे काम भारतीय हवामान विभागाकडे देण्यात आले असून या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे.
धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे कोयना धरण सुरक्षितता विभागाने याला महत्व देत कोयना धरणाच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिल्याचे म्हटले जात आहे. कोयना परिसरात ११ डिसेंबर १९६७ रोजी सहा रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर एक ते तीन रिश्टर स्केलचे भूकंप या परिसरात सतत होत असल्याचे निदर्शनास आले. कोयना, पाटण, हेळवाक आणि पोफळीतील सह्याद्री घाट परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भागात भूकंप झाल्यानंतर पाटण, कराड, शिराळा, चिपळूण, देवरूख, संगमेश्वर, खेड भागातील गावांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचा भविष्यातील धरणांच्या रचनेत कसा उपयोग होईल, त्याअनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी 'स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ' बसविण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता, त्याला सरकारकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.
कोयना धरण परिसरात दरवर्षी किती भूकंप होतात. त्यांची संख्या आणि तीव्रता जाणून घेण्यासाठी कोयनेत स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. या कामासाठी पुरेसा निधीही उपलब्ध असून आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे. सुरक्षितता आणि सुधारणा यासंदर्भातील काही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातून कोयना धरणाची सुरक्षितता अधिक बळकट होणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
कोयना धरणातील जलसाठा, भूगर्भातील हालचाली आदींचा वेध घेण्यासाठी धरणात विविध प्रकारांची उपकरणे कार्यरत असतात. त्यानुसार कोयना धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात प्रत्येकी तीन उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यामार्फत संकलित होणाऱ्या माहितीद्वारे भूकंपाच्या धक्क्यांमुळे होणाऱ्या धरणाच्या संभाव्य नुकसानीचा अभ्यास करता येणार आहे.
