दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली टोरेंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांची भेट.
दिवा, ( आरती परब ) : दिवा शहरातील नागरिकांना टोरेंट पॉवर कडून वेठिला धरले जात असल्याच्या अनेक तक्रारी मनसे कार्यालयात येत होत्या. ज्यात प्रामुख्याने नवीन मीटर जोडणी मिळण्यासाठी रितसर अर्ज करूनही वर्षे - दीड वर्षे ग्राहकांना नविन वीज जोडणी न देणे. तसेच नवीन वीज कनेक्शन साठी अर्ज करूनही वर्षभर वीज जोडणी देत नाहीत म्हणून स्वतः जोडणी करून वीज वापरणाऱ्यांवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करणे या दोन प्रमुख तक्रारी होत्या. तसेच या सर्व तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी दिव्यातील नागरिकांना भारत गियर्स येथील दावत कार्यालयात जावे लागते. ज्यामुळे नागरिकांचा खूप सारा वेळ आणि पैसा हा तिथपर्यंत पोहचण्यासाठी खर्च होत असतो.
याच प्रश्नासंदर्भात दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज टोरेंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांची भेट घेवून या सर्व विषयांवर चर्चा केली. यावेळी या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढून लोकांना नवीन वीज मीटर कनेक्शन वेळेवर देण्याचा तसेच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करूनही ज्यांच्यावर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांची कागदपत्रे तपासून त्यांना त्यात दिलासा देण्याचे आश्वासन टोरेंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले. यासोबतच आठवड्यातून तीन दिवस टोरेंट पॉवरच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिव्यातील टोरेंट ऑफिस मध्येच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. जेणेकरून दिव्यातील वीज ग्राहकांना भारत गियर्स येथील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. टोरेंट पॉवरच्या महाव्यवस्थापकांनी मनसे शिष्टमंडळाची ही मागणी देखील मान्य केली.
यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, साबे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील, शाखाध्यक्ष अंकिता कदम, सागर निकम, उपशाखा अध्यक्ष जितेंद्र गुरव, समीर कदम उपस्थित होते.