शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या कामकाजाचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आढावा
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये भर टाकणाऱ्या शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे कामकाज गुणवत्तापूर्वक करून ते वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला व उपस्थित अधिकारी वर्गाला कामकाजाबाबत सूचना केल्या. ६०० बेडचे जनरल हॉस्पिटल, २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल व २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल असे मिळून ११००० बेडचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे येत्या २२ महिन्यात उभे राहणार आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी त्यांनी केली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपाभियंता हेमा जोशी, अभियंता सारिका कुंभार यांच्यासह हॉस्पिटल सर्विसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशनचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू असलेल्या कामकाजाचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. तसेच; प्रत्यक्ष त्या -त्या ठिकाणी जाऊन कामांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, मी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी येऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेणार आहे. अकराशे खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामकाजासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. यातील दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता उर्वरित २२ महिन्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे. दिलेल्या कालावधीत सर्व कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करून यामध्ये कोणतीही अडचण आल्यास मला सांगा, असेही ते यावेळी म्हणाले.
यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील इतर इमारतींच्या कामकाजाबाबत आढावा घेतला. उपस्थित कार्यकारी अभियंता रोहित तोंदले व उपाभियंता हेमा जोशी यांनी कामकाजाबाबत माहिती दिली. ५३६ कोटींच्या अकराशे खाटांच्या इमारतीमध्ये ६०० खाटांचे जनरल हॉस्पिटल आहे. ते एकूण सात मजल्यांचे असणार आहे. तसेच; २५० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल सहा मजल्यांचे व २५० बेडचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इमारतही सहा सहा मजल्यांची असणार आहे. या व्यतिरिक्त किचन लॉन्ड्री अशा वेगवेगळ्या इमारती बाजूला बांधण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एकूण १ लाख १ हजार स्क्वेअर मीटरचे बांधकाम प्रस्तावित आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर अंतर्गत इमारत प्रकल्प उपविभाग यांच्याकडे ८४ कोटींचे विविध इमारतींचे कामे सुरू आहेत. यामध्ये १४.६८ कोटींचे अंतर्गत रस्ते, गटर व फुटपाथ बांधणे हे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालय आवारामधील जमीन सपाटीकरण व सुशोभीकरण करणे हे १४.६० कोटी रुपयांचे काम प्रगतीत आहे. त्याचा आवारामध्ये बॅडमिंटन कोर्ट व टेबल टेनिस कोर्टचे बांधकाम करणे हे ४.५६ कोटींचे असून याचा नुकताच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. फॉरेन्सिक विभागाची इमारत बांधण्यासाठी १४.७४ कोटी रुपये मंजूर असून याही कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. निवासी व आंतरवासिता पुरुष डॉक्टर्स यांच्यासाठी प्रत्येकी १२५-१२५ क्षमतेचे वसतिगृह बांधकाम करण्यासाठी १.३६ कोटी मंजूर असून याही इमारतीच्या कामाला सुरुवात केली आहे. महिलांच्या आंतरवासिता व निवासी डॉक्टर्स यांच्यासाठी प्रत्येकी १२५-१२५ क्षमतेचे वसतिगृह बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे. परिचारिकांकरिता वसतिगृह व वार्षिक १०० क्षमतेचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र बांधणे १.३६ कोटी तसेच वसतिगृह करिता फर्निचर १४.९६ कोटी, परिचारिका वसतिगृहाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्थापत्य, विद्युत व फर्निचर काम १४.९९ कोटी ही कामे निविदा कार्यवाही प्रगतीत आहेत. तसेच १५० क्षमता असलेल्या मुलींच्या करिता वसतिगृह इमारत बांधणे हे १.३६ कोटींची असून तेही काम प्रगतीपथावर आहे.
इमारत प्रकल्प उपविभागाकडून नुकतेच शासकीय महाविद्यालयातील २० कोटींच्या ऑडिटोरियम हॉल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्या इमारतीमधील फर्निचर, एकोस्टिक, विद्युतीकरण व इतर अनुषंगिक बांधकामाचे एकूण ९.५९ कोटी रुपयांचे काम प्रगतीत आहे. १५० मुलीं करिता वसतिगृह इमारत बांधकाम एकूण १६.९५ कोटींचे पूर्ण झाले आहे. ७.४४ कोटींच्या शवगृहाचे श्रेणीवर्धन अंतर्गत बांधकामही पूर्ण झाले आहे. त्या ठिकाणी असलेले व्याख्यान कक्ष व परीक्षा कक्ष इमारतीचे एकूण ९.५५ कोटींचे कामे पूर्ण झाले आहे. दहा कोटींचे ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी या इमारती पूर्ण झाल्या आहेत.