सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमदार निधीतून पैसे देऊ

 



वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कागल तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुरगुड, बाजूच्या गावातील कचरा प्रश्न, कागल एमआयडीसी, सावर्डे येथील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंत गोळे, तहसीलदार अमरदीप वाकडे, महावितरण ग्रामीण विभाग २ चे कार्यकारी अभियंता बनगे, कामगार आयुक्त इचलकरंजी भोईटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


मुरगूड, ता. कागल हद्दीतील माधवनगर मधील २५ प्लॉट (बेघर) धारकांचे नाव लावून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणे याबाबत बैठक झाली. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी मोजणी करून त्याठिकाणी लेआउट करावा. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा समितीसमोर सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. 


मुरगूड शहरातील पाटील कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, सावर्डेकर कॉलनी, कापशी रोड, देशमुख कॉलनी, भोसले कॉलनी व इतर कॉलनीतील घरांना शेतसारा व नगरपरिषदेचा घरफाळा असे दोन कर लागू असून त्यातील शेतसारा कमी करणे यासाठी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हा नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना मुख्याधिकारी समवेत पाहणी करून आठ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. मुरगुड पालिकेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो तसेच तो जाळला जातो. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झिरो कचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना संबंधित मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या. 




सावर्डे बु. ता.कागल येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या नळ पाणीपुरवठा योजने संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी जल जीवन मिशनमधील योजनेचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता गोळे यांनी दिली. गावातील उपस्थित सदस्यांनी काम सुरू करण्यासाठी मागणी केली. या योजनेत दोन वेळा पाणी लिफ्ट करावे लागणार आहे, पाणी शुद्धीकरण प्रकल्पही आहे तसेच यासाठी तिन्ही ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात यावा, अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. आवश्यकता असल्यास सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमदार निधीतून पैसे देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. सुधारित प्रस्ताव एमजेपीकडे पाठवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले. 


ओसवाल एफ. एम. हॅमरले टेक्सटाईल, एम.आय.डी.सी तील कंपनी एक वर्षापासून बंद असल्याकारणाने कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी कंपनी कडून संबंधित अधिकारी अनुपस्थित होते. यावेळी बँक आणि कामगार आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत शेवटची संधी म्हणून एक बैठक लावून कंपनी मालक यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरले. संबंधित कंपनी बंद पडल्याने अनेक कामगारांचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावेळी शेंडा पार्क येथील ११०० बेड रुग्णालय डी.पी. प्लॅन मधील जाणारा नवीन रस्ता विकसित करणे बाबत बैठकीत चर्चा झाली. 





Post a Comment

Previous Post Next Post