- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन
- १५ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा
कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून प्रत्येक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी करा. यामुळे लोकशाही अधिक बळकट होण्यासाठी मदत होईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर येथे १५ वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकादरम्यान अनेक जनजागृती उपक्रमातून चांगल्या प्रकारे मतदार नोंदणी झाली. त्याच प्रमाणात मतदान टक्केवारीही वाढली. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी महसूल तथा मतदान नोंदणी अधिकारी, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर.के.शानेदिवाण, साहित्यिक डॉ. राजन गवस, तहसीलदार स्वप्नील रावडे, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी उपस्थित होते.
निवडणूक प्रशासन मतदार यादी अधिक गुणवत्तापूर्ण असावी यासाठी प्रयत्न करीत आहे. नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या ॲपद्वारे तसेच संकेतस्थळावरून मतदान नोंदणी करावी तसेच पूर्वीप्रमाणे ऑफलाइन सुद्धा मतदार नोंदणी करता येते असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे लेखक, साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी नागरिकांनी आपले हक्क व कर्तव्य बजावणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देश बदलायचा असेल तर नागरिकांनी आपला हक्क व अधिकार लक्ष्यात ठेवून मतदान केले पाहिजे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस भारतात साजरा केला जातो. अधिक तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने याची सुरुवात केली आणि २५ जानेवारी २०११ रोजी प्रथम साजरा केला. यावर्षी १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला गेला. कोल्हापूर जिल्ह्यातील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे. निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष, भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी इतर उपाय योजनेबरोबरच मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विविध टप्प्यांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवले जातात. तसेच नवीन मतदार नोंदणीकरीता १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै वर १ ऑक्टोंबर हे चार अर्हता दिनाकांना वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या नावाची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी निश्चित केलेले आहेत. जेणेकरुन निकोप लोकशाहीमध्ये युवकांचा सहभाग वाढण्यास मदत होवून ते त्यांचा अमूल्य व पवित्र असणारा मतदानाचा हक्क बजावू शकतील अशी माहिती त्यांनी दिली.
प्रस्ताविकात समाधान शेंडगे म्हणाले, सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ३ हजार ४५० इतकी मतदान केंद्रे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची एकूण मतदार संख्या ३३ लाख २२ हजार ३५० इतकी असून यामध्ये पुरुष मतदार १६ लाख ७६ हजार ८८४, स्त्री मतदार- १६ लाख ४५ हजार २७९ व तृथीयपंथी मतदार १८७ आहेत. यामध्ये २७ हजार ५८४ इतके दिव्यांग मतदार असून १८ ते १९ वयोगटातील ८५ हजार २८१ व २० ते २९ वयोगटातील ६ लाख ५२ हजार ९६२ इतके मतदार आहेत. तसेच ८० वर्षावरील ३८ हजार ९६ इतके मतदार आहेत. व ८ हजार ६२९ सैनिकी मतदार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे मतदार यादीचे स्त्री-पुरुष गुणोत्तर हे ९८१ इतके आहे.
विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबीरामुळे तरुण वयोगटातील मतदारांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. ज्या व्यक्तींनी अदयापही आपले नांव मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही त्यांनी मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल' https://voters.eci.gov.in आणि 'वोटर हेल्पलाइन ॲप' (Voter Helpline APP) यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. कार्यक्रमावेळी उत्कृष्ट कामकाज केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन प्रकाश महाडेश्वर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.