आमदार राजेश मोरे यांना भेटून दिले निवेदन
दिवा, (आरती परब) :- दिव्याच्या आगासन गावातील शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर ठामपाने टाकलेली अन्यायकारक आरक्षणे रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा सुरू असून याबाबत ग्रामस्थांनी शिवसेना कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती असलेले निवेदन देण्यात आले. निवेदन दिले. हे अन्यायकारक आरक्षण रद्द करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर गावकऱ्यांची संयुक्त मिटींग लावून चर्चा व्हावी, अशी मागणी आगासन गाव संघर्ष सदस्य व ग्रामस्थांनी मोरेंकडे केली.
आगासन गावातील नागरिकांच्या लढ्याला या आधीच आगरी कोळी सामाजिक संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आगासन गाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी, ग्रामस्थांनी आगासन गावातील अन्यायकारक आरक्षणा विरोधात राजेश मोरे यांना या प्रकरणाचे गांभीर्य संपूर्ण दिवा शहराचा राखीव जागा, गुरचरण जागा, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जागा असलेला नकाशा दाखवून हा संपूर्ण विषय सांगितला. आम्ही ग्रामस्थ दिवेकरांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या विरोधात नसल्याचे आमदार मोरे यांना सांगितले. तसेच आम्ही सुचवलेले पर्याय आपण एकदा पहावे अशी विनंती ही मोरेंना ग्रामस्थांनी त्यावेळी केली.
आगासनच्या ग्रामस्थांच्या खासगी सातबाराच्या जमिनींवर महापालिकेने अन्य़ायकारक मनमानी पद्धतीने आरक्षण टाकले आहे. या ऐवजी सरकारी जागा दिव्यात ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये सदर सोयी सुविधांसाठी जागा उपलब्ध करून ठेवाव्यात, अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे केली आहे. आगासान गावातील ३४.६७ एकर मध्ये बसस्थानक, मार्केट, हॉस्पिटल, विभाग कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे, जलकुंभ आणि वाहनतळ इ. एकाच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनीवर आरक्षण टाकून अन्यायाची भूमिका घेण्यापेक्षा ज्या ठिकाणी जागा मोकळ्या आहेत व त्या पालिकेकडून आरक्षित आहेत, त्या जागा ताब्यात घेऊन जागा मालकाला योग्य तो मोबदला देऊन सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, अशीही मागणी निवेदनात केली आहे. त्यांच्याबरोबर आगासन गाव संघर्ष समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर आरक्षण हे हटवण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे व ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर गावकऱ्यांची संयुक्त मिटींग लावून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन आमदार राजेश मोरेंनी उपस्थित ग्रामस्थांना देऊन आश्वासित केले.