जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव येथील परंडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेने डब्यातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या एक्स्प्रेसने धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अपघाताबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना परंडा रेल्वे स्थानकाजवळ घडली. पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेच्या चाकांमधून धूर निघून आग लागल्याची ओरड केली, यामुळे प्रवाशांनी घाईघाईने रुळांवर उड्या मारल्या असता दुसर्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने ११ जणांना उडविले. या भीषण अपघातावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
परंडा रेल्वे स्थानकात ट्रॅक बांधणीचे काम सुरू असल्याने रेल्वेला सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे अचानक ब्रेक लावताच, चाकांमधून ठिणग्या उडू लागल्या, ज्यामुळे ट्रेनच्या दरवाज्यात बसणाऱ्या प्रवाशांनी आग लागल्याची अफवा पसरली. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली, त्यामुळे काही लोक ट्रेनमधून उड्या मारून लगतच्या रुळांवर पडले. त्याचवेळी त्यांना कर्नाटक एक्सप्रेसने धडक दिली. किमान ३० ते ४० इतर प्रवाशांनीही ट्रेनमधून उड्या मारल्या आणि तेही जखमी झाल्यााचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक अधिकारी बचाव कार्य आणि घटनेच्या तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. सध्या बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे, मी जिल्हा अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोललो आहे. बचावकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींवर लवकरात लवकर उपचार करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार असून जखमींचा संपूर्ण खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुष्पक रेल्वे अपघातावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी "पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. जळगावपासून ४० किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि एसपींशीही बोललो असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुष्पक ट्रेन दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून जखमींना पुरेसे वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींच्या उपचारासाठी मदत करण्याचे निर्देश दिले.
ईशान्य रेल्वे लखनऊचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आदित्य कुमार यांनी जळगाव रेल्वे अपघाताबाबत माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. लखनऊ जंक्शन येथे आपत्कालीन बूथ उभारण्यात आले आहे, जिथे लोकांना माहिती मिळू शकेल.