दिव्यात यंदाही शिवजयंतीचे आयोजन

 




दिव्यातील २०२५ च्या शिवज्योत मंडळाची नियोजन पूर्व बैठक संपन्न


दिवा, (आरती परब) :  छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवज्योत उत्सव, दिवा शहर या मंडळाच्या वतीने गेल्या वर्षी २०२४ चा शिवजयंतीचा वार्षिक अहवाल सादर करुन यावर्षी २०२५ चे शिवज्योतचे कशा प्रकारे नियोजन करायचे याची चर्चा करण्यात आली. उत्सवाची कार्यकारी टिम आणि नविन सभासदांच्या उपस्थित १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे नियोजन करण्यात आले. मंडळाचे हे ७ वे वर्ष आहे.

शिवराय मनामनात.. शिवजयंती घराघरात.. हा एकच ध्यास समोर ठेवून १९ फेब्रुवारी २०१९ रोजी स्थापना झालेल्या मंडळाचा एकच उद्देश आहे तो म्हणजे शिवरायांचे विचार घराघरात पोहचले पाहिजेत. दिवा शहरातील नगरा नगरात, सोसायटीमध्ये शिवजयंती उत्सव सण म्हणून साजरा झाला पाहिजे. १९ फेब्रुवारीला शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी वरून पायी शिवज्योत घेऊन येऊन दिवा शहरातील अनेक मंडळाना, सोसायटींमध्ये भेट देऊन शिवगर्जना करून भव्य दिव्य अशी नगरप्रदक्षिणा व शोभायात्रेचे शिवज्योत मंडळातर्फे दरवर्षी आयोजन करण्यात येते. दिवा पूर्वेतील बेडेकर नगर येथील लो प्राईज मार्ट येथून सकाळी भव्यदिव्य शोभा यात्रेला सुरवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा शीळ स्टेशन रोड, मुंब्रादेवी कॉलनी रोड येथून विठ्ठल मंदिर, दातिवली रोड येथे शिवज्योतीच्या शोभायात्रेची सांगता करण्यात येते.


या शोभायात्रेमध्ये शिवज्योतीसह, शिवपालखी, ढोलपथक, लेझिम पथक, तुतारी, घोडे व पारंपरिक वेशभूषासह महिला भगिनी, तसेच बालगोपाळ, अनेक सामाजिक संस्था, अनेक शाळा, क्लासेस, स्थानिक भूमिपुत्र, प्रमुख मान्यवरांचा सहभाग असतो. त्यामुळे मंडळाने नियोजन बैठकीत सर्व गोष्टींचा विचार करून सर्वांच्या विचाराने बदल करून येणाऱ्या शिवजयंतीची तयारी केली. त्यावेळी जास्तीजास्त लोकांना आपापल्या घरात, नगरात आपल्या राजाची शिवजयंती सण म्हणून साजरा करण्याचे व शोभायात्रेत सहभागी होण्याचे मंडळातर्फे आहवान करण्यात आले. 


गेल्यावर्षीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक पाटील यांनी सन २०२५ या वर्षासाठी कार्यकारी अध्यक्ष म्हणून सर्वांच्या वतीने नामदेव पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. तसेच २०२५ च्या नियोजनासाठी अनेकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावर्षीच्या कार्यकारी अध्यक्षांनी उपस्थितांना आवाहन केले की सर्वांनी तन- मन- धनाने शिवज्योत कार्यक्रमाच्या तयारीला लागू या आणि आपल्या राजाची जयंती सर्वांच्या सहयोगाने जल्लोषात साजरी करूयात. तुमचं आमचं नातं काय ...जय जिजाऊ जय शिवराय..

Post a Comment

Previous Post Next Post