मुंबईत कुस्तीचा महासंग्राम
मुंबई : अर्जुन पुरस्कार विजेते आणि ऑलिम्पियन तसेच मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त श्री. नरसिंह यादव यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘नरसिंह यादव दंगल लीग’ या भव्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी करत चॅम्पियनपद पटकावले. नरसिंह फाउंडेशन आणि नागरिक संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला परिसरातील श्री. विलासराव देशमुख मैदानावर रंगलेल्या या लीगमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब या देशातील कुस्ती परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या चार राज्यांचे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातून ५ पुरुष आणि २ महिला अशा ७ खेळाडूंनी सहभाग घेतला. एकूण २८ कुस्तीपटूंनी या स्पर्धेत आपली ताकद आणि कौशल्य दाखवले.
हरियाणाची दमदार सुरुवात
स्पर्धेची सुरुवात हरियाणा आणि पंजाब यांच्यातील चुरशीच्या सामन्याने झाली. या लढतीत हरियाणाच्या ५ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली, तर पंजाबच्या २ खेळाडूंनी बाजी मारली. परिणामी पहिला सामना हरियाणाने जिंकत आपली ताकद दाखवून दिली.
महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत आघाडी
दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आमनेसामने आले. या लढतीत महाराष्ट्राच्या ४ कुस्तीपटूंनी विजय मिळवत संघाला महत्त्वाची आघाडी मिळवून दिली, तर उत्तर प्रदेशच्या ३ खेळाडूंनी विजय मिळवला. अखेर हा सामना महाराष्ट्राच्या बाजूने झुकला.
अंतिम फेरीत महाराष्ट्राचा जलवा
अंतिम सामन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात रंगलेली लढत अत्यंत रोमांचक ठरली. महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटील, रविराज चव्हाण, आदर्श पाटील, अमृता पूजारी आणि सोनाली मंडलिक यांनी शानदार विजय मिळवत संघाला भक्कम आघाडी दिली. हरियाणाच्या अंकुश सागर दहिया आणि कुसुम दहिया यांनी आपापले सामने जिंकले. मात्र अंतिम निकाल ५–२ असा लागला आणि महाराष्ट्राने *‘नरसिंह यादव दंगल लीग’*चे मानाचे चॅम्पियनपद पटकावले.
मान्यवरांची उपस्थिती
या स्पर्धेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आमदार अतुल भातळखर, आमदार संजय उपाध्याय, दुबईस्थित उद्योगपती काझी अब्दुल मतीन, संपत साळुंखे, माजी खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच बॉलीवूड अभिनेते मुकेश ऋषी यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत वातावरणात उत्साह भरला.
आयोजकांचा विश्वास
यावेळी बोलताना आयोजक नरसिंह यादव म्हणाले, “देशातील कुस्तीला नवसंजीवनी देण्यासाठी अशा लीग स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या माध्यमातून अनेक नवोदित कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ मिळेल. मुंबईकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
स्पर्धेतील विजेत्यांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. विजेत्या महाराष्ट्र संघाला नरसिंह यादव आणि डॉ. शिल्पी शेरॉन-यादव यांच्या हस्ते चांदीची गदा आणि *‘नरसिंह यादव दंगल लीग’*ची मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
रोमांचक लढती, दमदार संघबळ आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा कुस्तीप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. महाराष्ट्राने संघभावना आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले.


