कोल्हापुरात सपत्नीक सत्कार; मान्यवरांकडून कार्याचा गौरव
कोल्हापूर \ शेखर धोंगडे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी रोजी निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्ती निमित्त कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयांतर्फे तसेच जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
माहिती विभागात छायाचित्रकार म्हणून कार्यरत असताना यमकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे छायाचित्रण केले. महापुरासारख्या आपत्तीपासून विविध शासकीय कार्यक्रमांपर्यंत त्यांनी अधिकृत छायाचित्रकार म्हणून जबाबदारी पार पाडली. कोल्हापूरचा अनेक दशकांचा इतिहास त्यांच्या कॅमेऱ्यातून जतन झाला आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक वसंत शिर्के, सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर तसेच अंकिता यमकर यांची उपस्थिती होती. सहकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर तयार केलेली चित्रफीत विशेष आकर्षण ठरली.
समारंभाला यमकर यांचे बालमित्र, आप्तेष्ट, कुटुंबीय तसेच माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रताप नाईक, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदीवाडेकर, रत्नाकर पंडित, सखाराम माने, दिलीप घाटगे यांच्यासह विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार व कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी यमकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या वक्तशीरपणा, सातत्य आणि दांडगा जनसंपर्क यांचा विशेष उल्लेख केला. माहिती विभागाचे स्थानिक संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी निर्माण केलेली ओळख आणि प्रसारमाध्यमांशी ठेवलेला सलोखा उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. “माहिती विभागाचे स्थानिक ब्रँड अॅम्बेसिडर” अशी त्यांची ओळख झाल्याचेही अनेकांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंपादक रणजीत पवार यांनी केले.


