ठाणे बार असोसिएशनकडून अभिनंदन; सामाजिक व कायदेशीर कार्याचा गौरव
दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ॲड. आदेश भगत यांचा ठाणे जिल्हा सत्र न्यायालय परिसरात ठाणे जिल्हा वकील संघटनेतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. न्यायालयीन क्षेत्रातील सहकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी त्यांच्या यशाचा आनंद व्यक्त करत पुढील सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
या सत्कार समारंभाला बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे चेअरमन तथा ज्येष्ठ विधीतज्ञ गजानन बाबाजी चव्हाण प्रमुख उपस्थित होते. यावेळी ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अप्पा कदम तसेच ज्येष्ठ वकील गुरुवर्य पी. बी. भोसले यांनीही ॲड. भगत यांचे अभिनंदन केले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात ॲड. आदेश भगत यांनी वकिली व्यवसायासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख केला. न्यायव्यवस्था आणि लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी जबाबदारी पार पाडताना ते जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सत्काराला वकील, सहकारी, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि गौरवमय होते.

