मंगळवेढा–पंढरपूर मार्गावर भीषण अपघात

डोंबिवली, परेल, कल्याण येथील चौघांचा मृत्यू; नऊ जखमी**

डोंबिवली \ शंकर जाधव :  तीर्थयात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा मंगळवेढा–पंढरपूर मार्गावर भीषण अपघात होऊन डोंबिवली, परेल आणि कल्याण येथील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

एका नामांकित गारमेंट कंपनीतील १३ कर्मचारी पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट येथे तीर्थयात्रेसाठी गेले होते. मंगळवेढा आणि पंढरपूर दरम्यान त्यांच्या क्रुझर वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चुराडा झाला.

या अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे, परेल येथील आदित्य गुप्ता (वय १४), तसेच कल्याण येथील सोनम अहिरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या सात जणांवर मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये, तर दोन जणांवर सोलापूर येथील सीएनएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


घटनेची माहिती मिळताच कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी रात्रभर सोलापूर येथे थांबून पीडित कुटुंबियांना धीर दिला. मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटल, सोलापूर येथील सीएनएस रुग्णालय, संबंधित पोलीस ठाणे आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय साधत त्यांनी मदतकार्य केले.

नगरसेवक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या शवविच्छेदनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून रुग्णवाहिका डोंबिवलीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी सायंकाळी सुमारे ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान पार्थिव उमेशनगर येथे आणण्यात येण्याची शक्यता आहे.

स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने सोलापूर जिल्हा रुग्णालयाशी संपर्कात असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण डोंबिवली शहरावर दु:खाचे सावट पसरले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post