खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. शहरातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण, शिक्षण, आरोग्य, धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प खासदार डॉ. शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील अंबरनाथ परिसरात विविध विकासप्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. याच विकास कामांचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
'बॉक्स' प्रकल्पित कामांची केली पाहणी
अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या आणि सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या शिवमंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून '' शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प '' राबविण्यात येत आहे. याप्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार, संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार असून वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, प्रवेशद्वारसमोरील चौकात नंदी, संरक्षक भिंत, चेक डॅम भक्त निवास आणि भव्य घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील भव्य घाट उभारणीचे काम जलदगतीने सुरु आहे. यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी, वाराणसी प्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे. भक्तनिवासाचे काम सुरु झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पूर्ण होऊन या शहराचे रूप पालटणार आहे.
महाराष्ट्र दिनी नाट्यगृहाचे लोकार्पण
अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे ३८.७१ कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे बंदिस्त नाट्यगृह उभारण्यात येत आहे. या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या १ मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून लवकरच अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवता येणार आहे.
व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
अंबरनाथ पश्चिम येथील नेताजी मार्केट परिसरात सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. याकामाची ही यावेळी पाहणी करून उत्तम दर्जाचे काम व्हावे यासाठी विविध सूचना केल्या. तर याचे काम हे '' व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स '' या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे. यामुळे एकाच छताखाली खेळाडूंना विविध खेळ खेळता येणार आहे.
पालिकेच्या शाळा हायटेक होणार
शहरातील कैलासनगर येथील लोकल बोर्ड शाळा क्रमांक १ आणि स्वामी नगर शाळा क्रमांक ११ या दोन्ही शाळांची अत्यंत जीर्ण झालेली इमारत तोडून लोकल बोर्ड शाळा क्रमांक १ येथे दोन्ही शाळांची एकत्रितरित्या इमारत बांधण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त आणि विविध सुविधांनी युक्त अशी नवीन शालेय इमारत उपलब्ध होणार आहे.


