महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन
कल्याण, ( आरती परब ) : आजच्या महिलेवर घरातल्या जबाबदारी बरोबर ऑफीसमधील ताणही असतो आणि या सर्वांचा शरीरावर विपरीत परिणाम होवू नये म्हणून प्रत्येक महिलेने स्वत:साठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी गुरुवारी केले.
दि. ०४ फेब्रुवारी रोजी मअसलेल्या जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि फोर्टीज हॉस्पिटल, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या मा.स्थायी समिती सभागृहात महापालिका मुख्यालयातील पुरुष कर्मचा-यांसाठी ओरल स्क्रिनिंग व महिला वर्गासाठी आयोजिलेल्या ब्रेस्ट स्क्रिनिंग आणि मोफत कर्करोग स्क्रिनिंग शिबीराच्या शुभारंभसमयी बोलताना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. स्वत:ची LIFE STYLE & EATING HABITS चांगल्या ठेवल्या तर महिला निश्चितपणे स्वत:चे स्वास्थ चांगले राखू शकतील. फोर्टीजच्या सहकार्याने आज संपन्न झालेल्या कर्करोग तपासणी शिबीराचा लाभ महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी वर्गास निश्चितच होईल, असे सांगत महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी फोर्टीज हॉस्पिटलने केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त पदी प्रथमच एक महिला, आयुक्त पदी विराजमान झाल्या आहेत. एक महिला आयुक्त म्हणून महिलांना जाणवणा-या शारिरीक समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजना या बाबी लक्षात घेवून स्वत: पुढाकार घेऊन, महापालिका आयुक्तांनी हे शिबीर फोर्टीज हॉस्पिटलच्या सहाय्याने महापालिका मुख्यालयात आयोजित केले होते. या शिबीराचा लाभ महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी वर्गाने घेतला. या शिबीरात फोर्टीज हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ.हर्षित शहा आणि डॉ.उमा डांगी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, त्याची लक्षणे, निदान व त्यावरची उपचार पध्दती याबाबत उपस्थितांना महत्वपूर्ण माहिती विशद केली. या शिबीराचे आयोजनात फोर्टीज हॉस्पिटलच्या माधवी वारीक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली.
या शिबीर समयी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांनी प्रास्ताविक केले आणि हे शिबीर यशस्वी होण्यासाठी महापालिकेतील डॉ.सुहासिनी बडेकर, डॉ.प्रतिभा पानपाटील, डॉ.सतेजा शर्मा, डॉ.रश्मी ठाकुर, डॉ.रेखा दौंड तसेच वैद्यकीय आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन महापालिकेच्या प्रभागात देखील करण्याचा मानस असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांनी दिली.