गावागावाप्रमाणे आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावे


साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कृष्णात खोत यांनी व्यक्त केली इच्छा

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ ला इचलकरंजी येथे सुरुवात


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते, पुस्तके आपल्याला कित्येक गोष्टी शिकवतात ती जणू जिवंत माणसंच आहेत.  ती आपल्याला कधीही धोका देत नाहीत. गावागावात असणारी ग्रंथालये व ते चालवणारे ग्रंथपाल खऱ्या अर्थाने आज ग्रंथ चळवळ टिकवून आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम, ग्रंथालय संघ कार्यवाहक भीमराव पाटील, आपटे वाचन मंदिराचे अध्यक्षा सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ जिल्हा समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. 


कृष्णात खोत यावेळी म्हणाले, लेखक व त्यांचे लेखन खऱ्या अर्थाने आपली, आपल्या समाजाची संपत्ती आहे. समाजाने हिटलरकडे न जाता गौतम बुद्धांकडे जावे. साहित्य हे शांततेचा आवाज मोठा करते. साहित्य, वाचन आणि ग्रंथसंपदेमुळे त्यांचा शेक्सपिअर जगाला कळला, परंतु आपल्या घरात असणारा तुकाराम मात्र अजून कित्येकांना माहित नाही. प्रत्येकाची भाषा, प्रत्येक समाजाची भाषा टिकली पाहिजे. जगातील वेगवेगळे साहित्य आपल्या भाषेत आले पाहिजे तर आपले साहित्य जगाच्या भाषेत भाषांतरित केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण तसेच ना. धो. महानोर यांचे वाचन तसेच लेखन क्षेत्रातील विविध किस्से सांगून लेखकांनी खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या सामान्य गोष्टी आपल्या लेखनातून समोर आणाव्यात. कारण सामान्य जगातील सामान्य गोष्टी लेखक आपल्या साहित्यातून सर्वदूर पोहोचवतो. मुलांच्या हातात पुस्तक येण्यासाठी पालकांच्या हातातील रिमोट बाजूला करणे आवश्यक आहे. जगण्याची समृद्धी खऱ्या अर्थाने पुस्तकात आहे. म्हणून ग्रंथालयांनी खेड्यापाड्यात कुठेतरी चांगले लेखक वाचनातून तयार करणे गरजेचे आहेत असे त्यांनी पुढे सांगितले. 



अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ग्रंथोत्सवामध्ये दोन दिवस चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून या ग्रंथोत्सवासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढवावा असे सांगितले. विद्यार्थ्यांनी तसेच युवा पिढीने ग्रंथ साहित्याकडे वळणे आवश्यक असून डिजिटल युगात इंटरनेटचा संदर्भ घेण्याचे कमी करून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने पुस्तकांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी त्यांच्यात वाचन संस्कृती वाढवणे आता गरजेचे झाले आहे. जिल्ह्यातील  ६३१ पेक्षा जास्त शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना जवळील शाळांची जोड देऊन विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे वळवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वाचन मंदिराकडे वळवण्यासाठी ग्रंथालय, ग्रंथपाल, शिक्षक आणि पालक यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिले पाहिजे.  वाचन संस्कृती वाढवण्यासाठी असे विविध उपक्रम येणाऱ्या काळात वाढवून त्यांना प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


उद्घाटनीय कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साहित्यिक कृष्णात खोत यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान केला. या ग्रंथोत्सव आयोजनासाठी इचलकरंजी महानगरपालिका, हातकणंगले तालुका ग्रंथालय संघ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे. उद्घाटनीय समारंभाच्या अगोदर सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी इचलकरंजी शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटनीय समारंभानंतर ग्रंथ प्रदर्शन, विक्री या ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते फीत कापून विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या विविध ग्रंथ साहित्याची पाहणी केली.





Post a Comment

Previous Post Next Post