साबे गावातील वाहतूकीस अडथळा करणारे काम तात्काळ थांबवा

Maharashtra WebNews
0


साबे व दिवा ग्रामस्थ आक्रमक ; रेल्वे प्रशासनाला इशारा 


दिवा \ आरती परब : दिवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील साबे गाव, यशोदा बाळाराम पाटील नगर या दिशेकडील वाहतूकीस अडथळा निर्माण करणारे काम सुरु असून रेल्वे प्रशासननाने ते तात्काळ थांबवावे, अशी आक्रमक मागणी साबे आणि दिवा ग्रामस्थांनी केली आहे.  


दिवा रेल्वे स्थानक पूर्वेकडील स्टेशनच्या तलावाजवळ रेल्वे प्रशासनाचे पादचारी पुलावरुन जाण्या- येण्यास नागरिकांसाठी पायऱ्यांचे काम सुरु असून त्या कामामुळे साबे गावात जाणाऱ्या रोडवरील  वाहतूकीस अडथळा निर्माण होत असून अर्धा रस्त्याची जागा बाधित होत असल्याने ते काम त्वरित थांबविण्याची मागणी दिवा आर.पी.एफ.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशचंद्र तिवारी यांच्याकडे दिव्यातील साबे, दिवा ग्रामस्थ व रहिवाश्यांनी काल भेट घेऊन केली आहे. साबे गाव आणि यशोदा बाळाराम पाटील नगराची आताची लोकसंख्या अंदाजे एक ते दीड लाख असून त्यांना याचा फटका बसणार असल्याचे ग्रामस्थांनी त्यावेळी सांगितले. तसेच हे काम न थांबल्यास निषेध व्यक्त करण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी त्यावेळी स्पष्ट केले.





साबे गाव, यशोदा बाळाराम पाटील नगर या दिशेकडील जाणाऱ्या वाहतूकीस दिवा स्टेशन तलावाजवळील हा एकमेव रस्ता आहे. त्या रस्त्यावर साबे गावात जाणाऱ्या रिक्षांचा स्टॅंड असून तेथेच दिवा गावातील मच्छी मार्केट ही भरते. तर तो रस्ता आधीच अरुंद असताना पुन्हा तेथेच पादचारी पुलावरुन जाण्या- येण्यास पायऱ्या काढण्याचे काम रेल्वे कडून होत आहे. आताच काम सुरु असताना त्या रस्त्यावरुन फक्त एकच रिक्षा जाते आहे. तर तेथून पुढे रुग्णवाहिका कशी जाणार, आग लागल्यास अग्निशमन गाडी कशी जाणार, पाण्याचे टॅंकर कसे जाणार, असा सवाल निलेश पाटील साबे ग्रामस्थ यांनी आरपीएफ निरिक्षक तिवारी यांच्याकडे केला. 


मध्य रेल्वे प्रशासनाचे विभागीय महाव्यवस्थापक (GM) आणि विभागीय व्यवस्थापक (DRM) यांना सदर सह्यांचे निवेदन देणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. प्रसंगी दिवा गाव ग्रामस्थ ॲड. आदेश भगत, अमर पाटील, उमेश भगत, साबे गाव ग्रामस्थ निलेश पाटील, दिगंबर भोईर, कुणाल पाटील, प्रदीप भोईर, अंकुश मढवी, दिनेश म्हात्रे, अमित पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)