ठाणे : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ‘१०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ व ‘महा आवास अभियान सन २०२४-२५’ अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्त सर्वत्र एकाच दिवशी १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी सर्व ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता.
ठाणे जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेंतर्गत एकूण १६ हजार ९०३ घरकुल लाभार्थ्यांचा घरकूल भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी ग्रामपंचायत स्तरावर संपन्न झाला असून भिवंडी तालुक्यातील राहूर ग्रामपंचायतीमधील कुंभारशीव येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते घरकूल भूमिपूजन करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर व मुरबाड येथील ग्रामपंचायतींच्या घरकूल भूमिपूजनास भेट दिली.
कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीमध्ये घरकूल भूमीपूजन कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांचे उपस्थितीत पार पडला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने घरकूल भूमिपूजन कार्यक्रम राबविण्याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले व घरकूल भूमीपूजन कार्यक्रमांमध्ये लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ, लाभार्थी यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घरकूल भूमिपूजन कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आहे.