आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन ; न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार’
मुंबई : आयआयटी मुंबईचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याचा शनिवारी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांनी सोमवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी केले आहे.
साहिलच्या पालकांनी यापूर्वी आयआयटी मुंबईमध्ये जातीय भेदभाव आणि छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर साहिलने टोकाचे पाऊल उचलल्याचा त्यांचा दावा आहे.
एका व्हिडिओ संदेशात रविंद्र वाकोडे यांनी मुंबई पोलिसांकडून त्यांना आयआयटी पवईच्या परिसरात प्रवेश करण्यास परवानगी दिली जात नसल्याचा दावा केला. दोन-तीन वेळा परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कॅम्पसमध्ये आंदोलन करण्यास परवानगी नसल्याने सोमवारपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना उद्देशून वाकोडे म्हणाले की, साहिलच्या पालकांकडून मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी काहीही केले जात नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. “माझा मुलगा आता नाही; मात्र तुमच्यासमोर संपूर्ण भविष्य आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आमच्या उपोषणात सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकरणातील सत्य समोर येणे महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनी आपला लढा सोडू नये, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांसह इतर व्यक्तींविषयी पसरवल्या जाणाऱ्या विविध चर्चांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
“मुलाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू,” असे वाकोडे यांनी सांगितले. तसेच कोणाकडूनही प्रभावित न होता विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत उभे राहावे आणि उपलब्ध असलेले पुरावे सुरक्षित ठेवावेत, अशी विनंती त्यांनी केली. न्यायालयीन प्रक्रियेत या पुराव्यांची आवश्यकता भासू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गुरुवारी साहिलचे पालक भांडुप येथे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असल्याचा दावा त्यांचे वकील निखिल कांबळे यांनी केला होता. त्यावेळी ते पवई येथील आयआयटी मुंबईच्या कॅम्पसकडे जात असल्याचे वकिलांनी सांगितले.
याआधी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे का आणि त्यातून ते टोकाचे पाऊल उचलत आहेत का, असा प्रश्न त्यांनी आयआयटी पवईच्या भेटीदरम्यान उपस्थित केला होता.
